मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे कारस्थान गुजरातच्या भूमीतून; संजय राऊतांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून बारसूतील रिफायनरी प्रकल्पावरून शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे कारस्थान गुजरातच्या भूमीतून सुरु आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच रिफायनरीचे तंत्रज्ञान अत्याधुनिक असते व त्यात कमीत कमी माणसांचा वापर होतो. त्यामुळे ‘हजारो लोकांच्या रोजगाराचा गूळ लावू नका. या प्रकल्पामुळे मुंबईप्रमाणे कोकणावरही पाणी सोडण्याची वेळ मराठी माणसांवर येईल असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नाणार येथे आधी रिफायनरी होणार होती. त्यास जनतेने विरोध केला. नाणारला पर्याय म्हणून बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी करता येईल काय? याची चाचपणी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार असताना झाली, पण अर्थात जनतेचा विरोध नसेल तर, ही त्यांची भूमिका स्पष्ट होती. आता बारसूचे लोकही विरोध करतात. “अशाने महाराष्ट्राचा औद्योगिक विकास कसा होणार? उद्योगांना विरोध करणे बरे नाही,” असा प्रश्न आता विचारला जातो. तो खरा आहे, पण चिपळूण येथे असलेली एमआयडीसी व त्यातील मोठ्या उद्योगांना कोणीच विरोध केला नाही. रायगड जिल्ह्यात मोठे उद्योग आहेत. अनेक रासायनिक प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहेत. अलिबागच्या थळ येथे राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स (RCF) आहे व त्यासाठीही शेकडो एकरचे भूसंपादन झाले. पाताळगंगा येथे अंबानींचा प्रकल्प आहे, त्यासाठीही लोकांनी जमिनी दिल्या. त्यामुळे कोकणची जनता प्रकल्पांना विरोध करते हा प्रचार चुकीचा आहे. वेदांत फॉक्सकॉन, एअरबससारखे प्रकल्प महाराष्ट्रातून का गेले? ते काही कोकणात नव्हते व त्यांना कोणीच विरोध केला नव्हता. हे प्रकल्प का गेले? याचे उत्तर महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांनी द्यायला हवे असं संजय राऊत यांनी म्हंटल.

मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व कमी करण्याचे गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मुंबई यापुढे देशाची आर्थिक राजधानी राहू नये यासाठी जे अथक कारस्थान दिल्लीच्या पातळीवर चालले आहे ते रोखायची हिंमत रजेवर असलेले मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांकडे आहे काय ? ‘रिफायनरी’ चे काय करायचे याचा निर्णय आता कोकणची जनता घेईल. राजापूर-बार परिसरात ज्यांनी जमीन खरेदी करून आधीच ठेवली. त्यांच्या दलालांनी यावर बोलू नये.

रिफायनरीचे तंत्रज्ञान अत्याधुनिक असते व त्यात कमीत कमी माणसांचा वापर होतो. त्यामुळे ‘हजारो लोकांच्या रोजगाराचा गूळ लावू नका. शेतकरी स्वत:च्या हक्काची जमीन, फळबाग देईल व नंतर भिकेला लागेल. मुंबईप्रमाणे कोकणावरही पाणी सोडण्याची वेळ मराठी माणसांवर येईल. बारसूची रिफायनरी हा एक रासायनिक प्रकल्पच आहे हे आधी मान्य करा. ही रिफायनरी कोकणच्या फायद्याची आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईतील माहुल- चेंबूर परिसरात जाऊन तिथल्या लोकांची अवस्था आणि हाल पहावेत. माहुल परिसरात लहान मूल जन्माला येते तेच मुळी श्वसन व त्वचेचे विकार घेऊन. येथील रहिवासी अनेक व्याधींनी त्रस्त आहेत. कॅन्सर, दमा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. माणसाच्या जिवाचीच जेथे शाश्वती नाही तेथे काय करायचे आहेत हे विषारी प्रकल्प? असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.