कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका लागल्या आहेत. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावा- गावातील व भावकी- भावकीतील राजकारण चांगलेच तापलेले आहे. पाच वर्षांनी होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र जिल्हा बॅंकेच्या ठरावासाठी व आपल्यालाच मत मिळावे, यासाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसलेली आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जिरवाजिरवीचे राजकारण पहायला मिळाले. त्यानंतर आता विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. ज्या विकास सेवा सोसायट्या बिनविरोध होत होत्या, त्या सोसायटीमध्येही निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्हा बॅंकेत आपला ठराव पक्का व्हावा, यासाठी संचालक होण्यासाठी सावधानता म्हणून प्रत्येक नेता आत्तापासूनच सोसायटी ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु या राजकीय खेळीमुळे जिल्ह्यातील गावा- गावात विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
विकास सेवा सोसायटी ठराविक मतदार असल्याने भावकी- भावकीतील राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. गावा- गावात मोठमोठे बॅंनर लागलेले असून गाडी फिरवून लाऊड स्पीकरवही प्रत्येकजण प्रचार यंत्रणा राबवत आहे. सोसायटीला इतके महत्व नव्हते, असे जुने जाणते सांगत आहेत. तर दुसरीकडे जाहीर सभाचे फड चांगलेच गाजत आहेत. सभांमध्ये एकमेकांची उणीधुणी काढण्या बरोबर अश्वासनाची खैरातही केली जात आहे.