अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
देशात गेले काही दिवस कोरोनाचा वाढता फैलाव हे चिंतेचे कारण आहे तर दुसरीकडे विविध राज्यात वेगवेगळ्या नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा मधील आमफांन, उत्तराखंड मधील जळणारी जंगले आणि उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा या प्रदेशातील उष्माघात या समस्याही आ वासून उभ्या आहेत. राजस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक ५० अंश सेल्सियसच्यावर वर तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ परिसरातही सध्या लोक उष्माघाताशी झुंजत आहेत. अमरावती जिल्ह्यात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ऊन्हाचा पारा ४६ डिग्री च्या वर गेला असतांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील डेहनी शेतीशिवारात एका ५८ वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची घटना उघडकिस आली आहे. डेहनी येथील साहेबराव मोहोड वय ५८ वर्ष असे मृत वृद्धाचे नाव आहे ते नेहमीप्रमाणे डेहनी येथे शेतशिवारात जनावरे चराईसाठी गेले होते. उन्हाचा पारा वाढला असल्याने त्याना मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसून त्यांचा मृत्यू झाला आहे. शिवारातील एका झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. तिवसा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसापासून नागपूर मध्ये ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीत आज ४३ अंश सेल्सियस तापमान आहे. उन्हाने चांगलाच जम बसविल्याचे दिसून येत आहे. कोरोना आणि उष्मा या दोन्ही गोष्टींमुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे नागरिकही चिंतेत आहेत. दरम्यान पुढचे किमान ३-४ दिवस हवामानात कोणताच बदल होणार नसून तापमान वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महारष्ट्रासोबत वरील इतर राज्यातही उन्हाची तीव्रता कायम राहणारं असल्याची माहिती मिळाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.