हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून दौरे, सभा, बैठका याची तयारी सुरू आहे. यात जागा वाटपाबाबतची चर्चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीने जागांचा फॉर्मुला ठरवला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार असून, त्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. मेरिटच्या आधारे जागावाटपाचे सूत्र निश्चित केले केले असून, लवकरच ते जाहीर केले जाईल. उलट महायुतीमध्ये वाद आहेत. महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने राज्यातील लोकसभेच्या ४० ते ४१ जागा जिंकेल”
त्याचबरोबर, “महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील. भाजपच्या विरोधात लढणाऱ्यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असून, या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार, उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दिल्लीत चर्चा होईल” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, जागा वाटपाची चर्चा रंगली असताना महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याचे समोर आले आहे. या फॉर्मुलानुसार काँग्रेसला 21 ते 22 जागा मिळू शकतात तर शिवसेना ठाकरे गटाला 17 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 जागा, वंचित बहुजन आघाडीला 2 जागा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.