खळबळजनक! कोरोनामुळे नेत्ररोगतज्ञाचा मृत्यू,4 दिवस घरातच कुजत होता मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना घरातच विलगीकरण करत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या दोन मनोरुग्ण भावंडांसह राहणाऱ्या नेत्ररोग तज्ञाचा आणि त्याच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा मृतदेह तीन-चार दिवसांपासून घरातच कुजत होता तर त्यांची बहीण किमान एक दिवस तरी त्याच घरात बेशुद्ध अवस्थेत असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचा धाकटा भाऊ वाचला असून त्याच्या करोना चाचणीचा अहवाल अद्याप बाकी आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, डॉक्टर सुबीर सुधीर रॉय (68),त्यांची बहीण गीतिका (65), तर त्यांचा धाकटा भाऊ संजय (60) राहत होते.
याबाबत बोलताना डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सांगितलं की डॉक्टर रॉय त्यांच्या दोन मनोरुग्ण भावंडांसह त्या फ्लॅटमध्ये राहत होते तिघेही अविवाहित होते विश्रांतवाडी आणि येरवडा इथं डॉक्टर सुधीर यांचे क्लिनिक होते.

रॉय यांच्या कुटुंबियांचे पुण्यातले काही नातेवाईक बऱ्याच दिवसांपासून त्यांना फोन करत होते मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे शेवटी शनिवारी त्यांनी स्वतः जाऊन पाहिलं तेव्हा दरवाजा ठोठावून ही बराच वेळ प्रत्युत्तर न आल्याने त्यांनी अग्निशामक दलाला बोलावून त्या रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा बेडरूमच्या बाथरूम मध्ये डॉक्टर रॉय यांचा कुजत असलेला मृतदेह आढळला. तसेच त्यांची बहीण गीतिका बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. तिला तातडीने ससून हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या तपासणीमध्ये तसेच डॉक्टरांच्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार त्या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान शनिवारी दुपारी गीतिका यांचा निधन झालं. डॉक्टरांचा मृत्यू तीन-चार दिवसांपूर्वी झाला असावा आणि त्यांची बहीण किमान एक दिवस भर बेशुद्धावस्थेत असावी असा अंदाज आहे.

दरम्यान या दोघांचा धाकटा भाऊ संजय यांचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप हाती यायचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. डॉक्टरांनाकोरोनाची लागण झाल्याचे आधी कळलं होतं का? हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र फ्लॅटचा तपासणीत कोरोना टेस्ट रिपोर्ट वगैरे काहीही आढळले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Comment