हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या अटकेचा दाखल देत भाजपवर निशाणा साधला आहे
शरद पवार म्हणाले, एखाद्या मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांला अटक केली तर त्याचा संबध दाऊदशी जोडणे हे चुकीचे आहे. मलिक हे मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातो. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण सिंधुदुर्गचे माझी सहकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही, असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात नारायण राणे यांना अटक केली तेव्हा त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याचा भाजपने निर्णय का घेतला नाही ? असाही सवाल शरद पवार यांनी केला. उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत, ते खुलासा करतील. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय लावण्याचा प्रकार आहे. नारायण राणेंना एक न्याय लावता, दुसरा नवाब मलिकांना दुसरा न्याय लावता, असाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.