हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत बँकांत 80% घोटाळे झालेत आणि सहकारी बँकात फक्त 7 % घोटाळे झालेत पण तरीही सहकारी बँकावर लोकं विश्वास का ठेवत नाहीत ? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मी कुठल्या घोटाळ्याचे समर्थन करत नाही पण यातून राज्य सहकारी बँकेला बदनाम करण्याचे एक मोठे षडयंत्र उभे केले जात आहे.पवार पुण्यात सहकारी बँकेच्या धोरणावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि.पुणे आयोजित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरी बँकाचा गौरव कार्यक्रम पुण्याच्या बालगंधर्व रगमंदिरात आयोजित करण्यात आला होता.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अजित पवार पुढे म्हणाले की “सहकार क्षेत्रात आपण कधीही राजकारण येऊ देणार नाही.नेहमी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन आपण काम करू अशी ग्वाही देतो. सहकारामुळे आपला महाराष्ट्र एवढा प्रगत आहे.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी लावलेल्या एका छोट्या वृक्षाची ही फळे आपण आज चाखतोय.हा सहकारचा वृक्ष असाच बहरत राहो अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की “सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द आहोत.सहकार क्षेत्राला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही.तसेच मागच्या सरकारमध्ये सहकार संबंधी निर्णय देताना दिरंगाई केली जात होती पण या सरकार मध्ये अशा कुठल्याच दप्तर दिरंगाईचा लोकांना सामना करावा लागणार नाही.
कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँक संचालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अनिल कवडे,ॲड.साहेबराव टकले,ॲड.सुभाष मोहिते,श्रीमती संगीता कांकरिया,विद्याधर अनास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.