गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत

thackeray gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले. खासदार शशी थरूर यांचा त्यांनी पराभव केला. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत काँग्रेस पुढील आव्हानांबाबत बोललं आहे. तसेच आता गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत असा टोला विरोधकांना लगावला आहे.

अपेक्षेनुसार काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे. 17 ऑक्टोबरला हे मतदान झाले होते. खरगे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. पक्षाच्या 9900 पैकी 9500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी खरगे यांना 7 हजार 897 मते मिळाली, तर थरूर यांना केवळ 1 हजार 72 मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला 137 वर्षांचा इतिहास आहे. या 137 वर्षांत अध्यक्षपदासाठी आता झालेली ही सहावी निवडणूक होती. त्यापैकी दोन निवडणुका स्वातंत्र्यपूर्व काळात झाल्या. स्वातंत्र्यानंतर 1950, 1977, 1997 आणि 2000 मध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला बिगर गांधी परिवाराचा सदस्य अध्यक्ष म्हणून लाभला आहे.

खरगे यांच्याआधी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी अध्यक्षपदी राहण्यास असमर्थता दर्शविल्याने सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षा म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होत्या. 2014 मध्ये प्रथमच काँग्रेस पक्षाला मोठा तडाखा देशपातळीवर बसला. नंतरच्या काळात काही राज्यांत काँग्रेसची सरकारे आलीही, पण राष्ट्रीय आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाची स्थिती नाजूकच राहिली. त्यात ‘जी-23′ या गटाच्या नावाने पक्षातील ज्येष्ठांनी उघड आव्हानाची भाषा केली. या गटात शशी थरूरही होते. अगदी आता निवडणूक प्रचारातही त्यांचा सूर तसाच होता.

पक्षातील अनेक वरिष्ठ नेते दुसऱया बाजूला आहेत, तर सामान्य कार्यकर्ते आपल्या बाजूला आहेत’ असा दावा थरूर करीत होते. प्रत्यक्षात त्यांना 9500 पैकी जेमतेम 1 हजार 72 मते मिळाली. सोनिया गांधी, राहुल यांचा कल खरगे यांच्याकडेच होता. म्हणूनच ते निवडून आले, असा एक ‘नरेटीव्ह’ पसरविला गेला असला तरी खरगे यांची गांधी कुटुंबाशी जवळीक हा गुन्हा कसा ठरू शकतो? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने बिगर गांधी कुटुंबाचा सदस्य काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आहे. काँग्रेस पक्षावर एरवी हुकूमशाहीचा आणि गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मंडळींचे डोळे निदान आता तरी उघडावेत. काँग्रेस हा 137 वर्षे जुना राष्ट्रीय पक्ष आहे. देशभरात आजही त्याची पाळेमुळे रुजलेली आहेत. तो आज कमकुवत असला तरी त्याची ‘शक्तिस्थळे’ शाबूत आहेत. खरगे यांना ती अधिक मजबूत करावी लागतील. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ आणखी पक्की होईल असे पाहावे लागेल.

सोनिया गांधी यांच्यासारख्या कणखर पक्षनेतृत्वाचे मार्गदर्शन, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेल्या मोठय़ा प्रतिसादाने काँग्रेस पक्षाचे देशभरातील कार्यकर्ते, समाजाच्या सर्व स्तरांतील काँग्रेसचे परंपरागत मतदार, हितचिंतक यांच्यात वाढलेला उत्साह, त्यांच्यात निर्माण झालेला विश्वास ही शिदोरी खरगे यांना आव्हाने पेलण्याचे बळ देईल. प्रदीर्घ काळ देशाची राजशकट सांभाळलेल्या काँग्रेस पक्षासाठी सध्याचा काळ संघर्षाचा आणि आव्हानांचा आहे. अशा वेळी आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागलेले मल्लिकार्जुन खरगे आता त्या पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. ही आव्हाने पेलून पक्षाला नवसंजीवनी देण्यात खरगे कितपत यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अस शिवसेनेनं म्हंटल आहे.