औरंगाबाद – औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. यात एक राणे समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकडे महाराष्ट्रातील गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर गेल्यामुळे फोनवरुन धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप, मनसे यांच्यासह इतरांनी ओवैसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यातच जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे.
तसेच काल त्यांनी औरंगाबादमधील पाणीप्रश्न, नामांतर यावरुन फडणवीस व ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. निवडणुकाजवळ आल्या की पाण्यावरुन राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.