ट्रॅक्टर रोटरमध्ये अडकून ट्रॅक्टर चालक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मोहोळ प्रतिनिधी । ट्रॅक्टर रोटर यंत्रांमध्ये अडकून झालेल्या विचित्र अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला ही घटना शुक्रवार दि १९ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारात घडली. सचिन लक्ष्मण खरात वय ३२ राहणार पुळुज तालुका पंढरपूर असे अपघातात मयत झालेल्या चालकाचे नाव आहे या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लक्ष्मण खरात हा ट्रॅक्टर चालक असून तो शेतामध्ये ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी रोटर, फनफळी इत्यादी कामे करत होता. शुक्रवार दि 23 फेब्रुवारी रोजी तो मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारातील विठ्ठल बजरंग करे यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन रोटर करत होता. मात्र रात्री पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान थंडीमुळे सचिन याने पांघरलेली रग (घोंगडी) अचानकपणे रोटर यंत्रात अडकली. त्यामुळे तो रोटरवर ओढला गेला. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. यात तो जागीच ठार झाला.

ट्रॅक्टर वाकडा तिकडा चालत असल्याचे पाहून मोबाईल पाहत बसलेला सचिनचा सहकारी अण्णा कुंभार (रा. पुळूज) याने जाऊन पाहीले असता, सचिन जखमी अवस्थेत रोटर यंत्राच्या जॉईंटमध्ये अडकलेला होता. त्यास आवाज देऊनही त्याचा कोणताच प्रतिसाद येत नसल्यामुळे सचिन जखमी होऊन मयत झाल्याची खात्री पटली. दुसऱ्या दिवशी शनिवार २4 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता या घटनेची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

याप्रकरणी मयत सचिनचा चुलत भाऊ प्रदिप भारत खरात यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बाळासाहेब शेलार हे करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे लांबोटी आणि पुळूज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment