हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच घोषणा केली आहे. “राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
राज्यातील महाविद्यालया संदर्भात मंगळवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी आज निर्णय जाहीर केला. मंत्री सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित असतील तर अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे.
सध्या राज्यातील अनेक महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु आहेत. तसेच अभ्यासक्रम आणि महाविद्यालयेही सुरु आहेत. कोरोनाचे प्रमाण जास्त वाढले तर या ठिकाणी महाविद्यालये ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील याबाबतही कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार आता सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.