हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई यथील अधिवेशनात आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंनी सभागृहात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा सभागृहात घेतला. “सरकारच्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. काल फडणवीस यांनी कविता सादर केली तेच ते तेच ते पण ते महिनाभर केले. महिनाभर दाऊद एके दाऊद केले. राज्य सरकार काय करत आहे. याकडे लक्षच नाही. गोंधळ घालताना राज्यपालानाही राष्ट्रगीतालाही थांबू दिले नाही. एवढा घोर अपमान क्वचितच झाला असेल, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, राम मंदिर नंतर दाऊदचा विषय हाती घेणार का? दाऊद कुठं आहे हे कुणाला माहिती आहे. रामाच्या नावानं मतं मागितली होती आता दाऊदच्या नावानं मत मागणार का? मेहबुबा मुफ्ती यांच्या सोबत सरकारमध्ये बसला होता, त्या सरकारला अफजल सरकार आणि बुऱ्हाण सरकार म्हणणार का? मी एकच सांगतो कि मी कडवट हिंदुत्त्ववादी आहे आणि राहणार आहे. एक म्हणं आहे, स्वत: चं ठेवायचं झाकून असा प्रकार आहे.
सुधीर मुनगंटीवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात. वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही तर सुपर मार्केटमध्ये मिळणार आहे. आपल्या बाजूला असलेल्या मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का? देशात एक लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. हे पाहून आपल्या राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत होता. पण काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.