हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरून नुकतेच आले आहेत. आता त्यांनी बेळगाव महाराष्ट्रात येण्याचा नवस करण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जावे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत. आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीहून नवस करून आले. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री परत गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला का जात नाही? सर्व मंत्री, आमदारांना घेऊन जावा. बेळगाव महाराष्ट्रात आलंच पाहिजे. तिकडे जाऊन नवसाने सर्व गोष्टी घडत असेल तर नवस करून सर्व गोष्टी पदरात पाडून घेऊ शकतो.
उदयनराजेचं धन्यवाद मानतो : ठाकरे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “उदयनराजेचं धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितलं होतं की, भाजपातील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरुवात झाली आहे. तसेच, महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे.”