विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.
मुख्यमंत्रीपदावरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देणं अनैसर्गिक ठरवलं जात असलं तरी इतिहासात शरद पवार आणि काँग्रेस यांनी शिवसेनेला मदत केलीच नाही असं नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने प्रादेशिक वादात जास्त न लक्ष देता त्यांचा बाहेरून पाठिंबा देण्यावर भर राहील. शरद पवार यांनी मुत्सद्दीपणा दाखवत शेवटच्या क्षणापर्यंत आपण विरोधी पक्षातच समाधानी असल्याचं सांगितलं. या परिस्थितीत शिवसेना आपलं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी नक्कीच हा पर्याय जवळ करू शकते. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा करण्याचा नवीन पर्याय निवडत सत्तास्थापन केली तर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही चित्र स्पष्ट दिसत नाही.
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनाच निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले होते. मात्र, विधानसभेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या ठाकरे घराण्याच्या या सुपुत्राला राज्यकारभार किती सांभाळता येईल यावर राजकीय वर्तुळात मतमतांतरं आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेनं आदित्यच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्यास विधानभवनात शिवसेनेला घेरण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही.
उद्धव ठाकरेंचा वाढता आक्रमकपणा पाहता ते मुख्यमंत्री झाल्यास भाजपाला विधिमंडळात ठामपणे तोंड देऊ शकतात. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदासाठी लायक उमेदवार नसणं हेच उद्धव ठाकरेंच्या पथ्याला पडणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतःकडेच राहील अशी जरब १९९५ ते १९९९ च्या काळात बसवली होती. तोच कित्ता आता सत्तेत जाऊन गिरवण्यासाठी उद्धव सज्ज आहेत. असं झाल्यास उद्धव हे ठाकरे घराण्याचे पहिले मुख्यमंत्री ठरतील.
गळचेपी भूमिका घेत भाजपच्या ताटाखाली जगणारं मांजर अशी शिवसेनेने स्वतःची अवस्था मागील ५ वर्षांत करून घेतली होती. या निवडणुकीनंतरही भाजप देईल तेच घेऊ या भूमिकेत राहू असा पवित्रा शिवसेनेने घेतला असता तर जनमानसात शिवसेनेची प्रतिमा ‘आणखी लाचार’ अशीच बनली असती आणि याचा फायदा नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झाला असता. कारण राज्य सध्या आक्रमक आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या शोधात आहे आणि उद्धवना ते जमत नसेल तर राज ठाकरे तयारच आहेत.
संजय राऊत यांच्या कृपेने भाजपला अंगावर घेण्याचं काम तर शिवसेनेने केलं. आता घड्याळाच्या हात धरून सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे.