नवी दिल्ली |महाराष्ट्रातील ६ खासदारांना नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात सहभाग मिळाला आहे. त्यापैकी ४ कॅबेनेट तर ३ राज्य मंत्रीपदे आहेत. तर मागील मोदी सरकारमधील मंत्री राहिलेले नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुश गोयल हे या वेळी देखील मंत्री झाले आहेत. तसेच आकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना देखील प्रकाश आंबेडकरांना पराभूत केल्याचा इनाम म्हणून मंत्रिपद देण्यात आले आहे.
नितीन गडकरी – गेल्यावेळी सांभाळत असलेली खाती नितीन गडकरी यांना यावेळी देखील देण्यात आली आहेत. नितीन गडकरी पुन्हा एकदा रस्ते बांधणी, भूपृष्ठ वाहतूक मंत्री असणार आहेत. नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
प्रकाश जावडेकर – प्रकाश जावडेकर यांच्याकडे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे या आधी मानव संसाधन विकास खात्याची जबाबदारी होती. प्रकाश जावडेकर हे राज्यसभेचे खासदार आहेत.
पियुष गोयल – महाराष्ट्रातील मूळचे असणारे मात्र महाराष्ट्रीयन माणसाला माहित नसणारे पियुष गोयल यांच्याकडे गत वेळी प्रमाणे या वेळी देखील रेल्वे खात्याची जबाबदारी असणार आहे. पियुष गोयल राज्यसभेचे सदस्य आहेत.
अरविंद सावंत – शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेच्या कोठ्याचे कॅबेनेट मंत्री अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा भार असणार आहे. गेल्या खेपेला देखील शिवसेनेकडे याच मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. अरविंद सावंत हे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार आहेत.
रावसाहेब दानवे – महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
रामदास आठवले – राज्यात मोठे दलित संघटन मागे असणारे नेते म्हणून रामदास आठवले यांच्या कडे बघितले जाते. रामदास आठवले यांना मंत्री पदावर कायम ठेवले जाणार का यावर उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र रामदास आठवले यांना मोदींनी त्यांच्या मंत्री मंडळात पुन्हा स्थान दिले आहे. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.
संजय धोत्रे – अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून लोकसभेत निवडून गेलेल्या संजय धोत्रे यांना केंद्रात राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अत्यंत महत्वाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.