राज ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांत होत असलेली गर्दी व गोंधळाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याची टीका मनसेनं केली आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांत एकेका गोष्टीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. त्यामुळं आजचा दिवस उजाडताच मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडले.

मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. एरवीच्या तुलनेनं सार्वजनिक वाहने कमी असल्यानं बस थांब्यांवर लोकांचीही गर्दी झाली होती. मॉर्निंग वॉकसाठीही लोक घोळक्यानं बाहेर पडू लागले आहेत. मुंबईसह इतर मोठ्या शहरातील या परिस्थितीला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

राजू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला ट्विटरवर प्रश्न विचारला आहे. “तुमचा लॉकडाउनचा एक्झिट प्लान काय ?” असा सवाल राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही” अशी टीका त्यांनी टि्वटमधून केली आहे. हे टि्वट त्यांनी महाराष्ट्र सीएमओ, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टॅग केले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं घेतलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही सहभागी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी सरकारला लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा ‘एक्झिट प्लान’ काय आहे असा प्रश्न विचारला होता. तसा प्लान तयार करण्याची सूचना राज यांनी केली होती. राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या याच सूचनेची सरकारला आठवण करून दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment