हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. उर्फी जावेद हिच्या अंतरंगी कपड्यामुळे आणि स्टाइलमुळे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी काल थेट राज्य महिला आयोगावरच गंभीर आरोप करत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनतर आयोगाने वाघ याना नोटीस पाठवली आहे. रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
महिला आयोग गेल्या 30 वर्षांपासून काम करते आहे. आयोगाची गरिमा मोठी आहे. मात्र चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे, महिला आयोगाची गरिमा राखली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. चित्रा वाघ यांना १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी याप्रकरणी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा महिला आयोगा कडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला.
गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत खोटी आणि चुकीची माहिती दिली, महिला आयोगानं तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला.