मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाने अखेर माघार घेतली असून यामुळे महाविकास आघाडीतील तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक पार पडली. यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
“विधान परिषेदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीनं ६ जागा लढवाव्या अशी आमची अपेक्षा होती. परंतु करोनाच्या या संकटात सर्व सदस्यांना मुंबईत आणणं आणि मतदान घडवून आणणं शक्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचीही विनंती केली. त्यानंतर आम्ही सर्व बाबींचा विचार करून ५ जागांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली आहे.
“करोनाचं संकट नसतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवार नसते तर कदाचित ही निवडणूक झाली असती. संख्याबळाचं आणि अन्य विचार करता आमच्या सहा जागा येणं शक्य होतं. परंतु एकंदरीत करोनाची परिस्थिती पाहता कोणाला या ठिकाणी मतदानासाठी आणणं शक्य नव्हतं. मुख्यमंत्री करोनाच्या संकटात स्वत: काम करत आहेत. संख्याबळाचाही आम्ही विचार केला त्यानुसार आमच्या वाटाल्या कमी जागा आहेत. आम्ही नंतर सर्व गोष्टींचा विचार केला आणि मुख्यमंत्र्यांनीही यात कोणताही गोंधळ वाढवू नये अशी विनंती केली,” असं थोरात म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.