पुणे । पुणे शहर म्हंटल्यावर डोळ्यासमोर काही ठिकाणे येतात. सारसबाग, लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग ही सर्वप्रथम नजरेसमोर येणारी ठिकाणे आहेत. कुठूनही आलेला मनुष्य एकदातरी या ठिकाणांना भेट देतोच. ही ठिकाणे प्रसिद्ध आहेतच पण नेहमीच वर्दळीखाली असणारी आहेत. मात्र संचारबंदीमुळे ही गर्दीची ठिकाणे शांत झाली होती. नेहमी लोकांनी गजबजलेले हे रस्ते सुमसान भासत होते. मात्र दोन दिवसापूर्वी तब्बल ५६ दिवसांनी लक्ष्मी रोडवरील काही सराफ व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली आणि इथे थोडीफार वर्दळ दिसून आली. लक्ष्मी रोड उघडला म्हंटल्यावर आता तुळशीबाग कधी उघडणार याचीही नागरिकांना उत्सुकता आहे. पण यासाठी नागरिकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.
लक्ष्मी रोडवरील काही सराफ दुकानदारांनी दोन दिवसापूर्वी आपली दुकाने उघडली. त्याबरोबर काही साड्यांची दुकाने उघडण्यात आली. काही छोट्या व्यवसायिकांनीही आपले व्यवसाय तब्बल दोन महिन्यानंतर पुन्हा सुरु केले. थोड्याफार प्रमाणात वर्दळ दिसून आली. लक्ष्मी रोडच्या जवळ असणाऱ्या तुळशीबागेतील दुकाने कधी उघडतील याचीही नागरिक वाट बघत आहेत. याबद्दल ही तुळशीबागेतील काही व्यावसायिकांनीही यावर हालचाली सुरु केल्या आहेत. पुढच्या आठवड्यापासून काही दुकाने उघडली जातील. मात्र सामाजिक अलगाव आणि इतर नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्यात येतील.
नेहमीप्रमाणे तुळशीबागेत मैत्रिणींसोबत रेंगाळत खरेदी करता येणार नाही. तोंडाला मास्क लावूनच सर्व दुकानांमध्ये जावे लागणार आहे. अलगाव पाळावा लागणार आहे आणि एका दुकानात तासंतास रेंगाळता येणार नाही. त्यामुळे तुळशीबाग सुरु झाली तरी तिथे पूर्वीसारखे मनसोक्त रेंगाळता येणार नाही आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका टाळत असताना पुढचे अनेक दिवस सर्व नियम आणि अटी पाळणे बंधनकारक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.