#HappyDiwali | आपल्या भारत वैविध्याने नटलेला देत. भारतात इतकी विविधता जरी असली तरी सगळीकडे या सणाचा एक समान दुवा सापडतो. तो म्हणजे-‘दिवा’,दीप. प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रदेशात घरोघरी दिवे लावून,पणती लावून हा सण आजही साजरा केला जातो. ज्योती-ज्योतीने सारा आसमंत उजळून निघतो. मग दिवाळीत ‘दीपाचं’ महत्त्व काय? जेव्हा या देशात इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट-ट्यूबलाईट नव्हते तेव्हा रात्रीचा अंधार दुर करण्याचं काम हे दिवेच करत होते. वेदांमध्ये म्हटलं आहे ‘तमसो मा ज्योतीर्गमय’-अंधाराकडून प्रकाशाकडे जावे. अंधाराकडून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जा हा दिवाळीचा खरा संदेश आहे.तात्पुरता का होईना हे दिवे घरातला अंधार दुर करतात. आजूबाजूला प्रकाश पसरवतात. अशा दिव्याच्या रांगांच्या रांगा लावून अमावस्येच्या रात्री सारा अंधारच नाहीसा व्हावा ही दिवाळीमागची खरी संकल्पना.
दिवाळी सणाबाबतच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक म्हणजे नरकासुराची. कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्याच्या ताब्यातल्या १६ सहस्त्र कैदी नारींच्या आयुष्यातला अंधार संपवला. समुद्रातून लक्ष्मी वर आली तेव्हा तिने दारिद्र्याचा अंधार संपवला. तिमीर म्हणजे वाईट प्रवृत्ती. जे जे काही वाईट आहे त्याचं प्रतीक म्हणजे अंधार. म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर दुरितांचे तिमीर जावो असं म्हणतात. अर्थात दुर्जनांमधील वाईटपणा, जे जे काही वाईट आहे ते जावो. आपल्यातील वाईट गोष्टी संपाव्या हीच दिवाळीची खरी ‘प्रार्थना’. म्हणून मग घर धुवून स्वच्छ पुसली जातात. नवे रंग दिले जातात. म्हणजे घरातील जी जी अस्वच्छता आहे ती पूर्णपणे नाहीशी केली जाते. अस्वच्छताही एक मोठा ‘अंधार’ आहे हे तर आज देशात सगळ्यांना चांगलंच पटतं आहे.
त्यात सगळ्यात मोठा अंधार असतो ‘अज्ञानाचा’! संतासाठी दिवाळी ही अज्ञानाचा अंधार दुर करणारी दिवाळी आहे. “साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा” म्हणताना साधू संत घरी आले असता त्यांच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. चार चांगल्या गोष्टी कानावर पडतात. अज्ञान दुर होते. हा खरा विचार आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. पण खरा आनंद हा ज्ञान मिळाल्यानेच होतो ही आमच्या संतांची धारणा आहे.
दिवाळी हा सण साजरा करणं नक्की कधी सुरू झालं याची ठोस माहिती कुणालाच नाही. प्राचीन भारतातही हा सण साजरा केला जात असावा असे काही उल्लेख आढळतातही. बरं या सणाशी निगडीत राज्याराज्यातील कथाही वेगळ्या आहेत. आंध्र प्रदेशात नरसिंहाची पूजा करून दिवाळीचा सण साजरा होतो. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कृष्णाने नरकासुराचा वध केला ही कथा दिवाळी सणाची कथा होते. तर उत्तर भारतात राम वनवासातून अयोध्येला परत आला म्हणून घरोघरी दिवे लावून रोषणाई करून रामाचं स्वागत केलं . राम घरी परत येण्याचा सण म्हणजेच दिवाळी ही उत्तर भारतातील लोककथा. याशिवाय दिवाळीच्या अनेक लोककथा-स्थानिक कथा देशभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याचं सगळ्यांची कारणं वेगळी. दिवाळी साजरी करण्याची पद्धत ही राज्याराज्यात बदलते. महाराष्ट्रातला फराळ आणि उत्तर प्रदेशातील प्रसाद सारखा नसतो. तर दक्षिण भारतातील पायास्सम महाराष्ट्रात खाल्लं जातंच असं नाही.