हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. गांगुली जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून बीसीसीआयचे नेतृत्व करीत आहेत. अशातच दुसरीकडे आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या शशांक मनोहर यांचा कार्यकाळही याच महिन्यात संपुष्टात येतो आहे. यानंतर जुलैमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
गांगुली यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सौरव गांगुलीला आयसीसी अध्यक्ष करावे, असा आवाज सध्याला उठत आहे. ही मागण्या केवळ भारतातच नाहीत तर इतर देशातूनही होते आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सध्या क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष असलेला ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे की,”सौरव गांगुलीकडे लीडरशिप क्वॉलिटी आहे आणि तो या आयसीसी अध्यक्ष पदासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वावर आजही लोकांचा विश्वास आहे. त्याने भारतीय संघाला परदेशात सामने जिंकण्यास शिकवले. या व्यतिरिक्त त्याने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रमुखपद देखील भूषविले होते आणि आता तो बीसीसीआय अध्यक्षाच्या मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याकडे एक चमकदार कर्णधारपदाचा आणि उत्कृष्ट प्रशासकाचा अनुभव देखील आहे. आता आयसीसी अध्यक्षपदासाठी जुलैमध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष असलेला ग्रॅमी स्मिथ याने सौरव गांगुलीला समर्थन दिले आहे.
ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे की,”भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याच्यासारख्या दिग्गज व्यक्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष व्हावे. गांगुलीसारख्या अनुभवी खेळाडूच्या या पदावर असल्याचा क्रिकेटला फायदाच होईल. आयसीसीचे अध्यक्षपद हे एक मोठे पद आहे आणि गांगुलीसारख्या व्यक्तीने हे पद सांभाळणे हे क्रिकेटसाठी चांगले होईल.
तो पुढे म्हणाला की,” गांगुली आयसीसी अध्यक्ष होणे हे आधुनिक क्रिकेटसाठी चांगले ठरेल. त्याला हा खेळ अधिक चांगला समजला आहे. त्याने तो अधिक उच्च स्तरावर खेळला आहे आणि कठीण समयी संघाची कमान देखील सांभाळली आहे. त्याचे नेतृत्व क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध होऊ शकते. तसेच त्याला आयसीसी अध्यक्ष होताना पाहणे हे औत्सुक्याचे ठरणार आहे.”
गांगुलीचे नेतृत्व आश्चर्यकारक आहे
सौरव गांगुलीने बर्याच वेळा हे सिद्ध केले आहे की,”परिस्थिती हाताळण्याची आणि त्यात सुधारणा करण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे. त्याला जेव्हा भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, त्यावेळी भारतीय संघ अनेक समस्यांनी वेढला गेला होता. त्यावेळी मॅच फिक्सिंगचे भूत हे भारतीय संघाच्या मानगुटीवर बसलेले होते. हा एक खूप मोठा वाद होता, त्यामुळे भारतीय संघाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली होती. पण या कठीण वेळी गांगुलीने टीम इंडियाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि मग भारताने परदेशातही विजयाचा झेन्डा रोवला.
गांगुलीने चांगली टीम तयार केली आणि चाहत्यांचा विश्वास पुन्हा जिंकला. मग जेव्हा त्याला बीसीसीआयची कमान मिळाली तेव्हा त्या वेळी बोर्डात अनेक गोष्टी विखुरल्या गेल्या होत्या. गांगुली गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष बनला होता. त्यानंतर गांगुलीने राष्ट्रीय संघापासून ते देशांतर्गत संघ आणि स्पोर्ट स्टाफपर्यंत सर्वांवर लक्ष दिले. गांगुलीच्या अध्यक्षतेखाली भारताने बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे पहिला गुलाबी बॉल कसोटी सामना खेळला. स्वत: गांगुली या कार्यक्रमाची सर्व तयारी पहात होता.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा कार्यकाळ हा येत्या जुलैमध्ये संपत आहे. अशा परिस्थितीत मंडळाने सर्वोच्च न्यायालयात कूलिंग ऑफ नियमात तीन वर्ष शिथिल करण्याची मागणी केली होती, परंतु अद्यापही या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.