हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.काल रात्री मध्यरात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबत मेल केला आहे.
राष्ट्रवादीचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजता विधानसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे डिस्क्वॉलिफिकेशन याचिका दिली आहे. या ९ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आमच्या पक्षाच्या 9 आमदारांनी शरद पवारांना किंवा मला कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या विरोधात जाऊन शपथ घेतली. या सर्व आमदारांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली. त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या 9 जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली आहे, तसेच निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आलं आहे. अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता या आमदारांचे नेमकं काय होणार हे पाहावं लागेल.