परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्लेश आंदोलन’ केले आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर ‘युती आणि आघाडी’तील कोट्यातील जागा कोण कोणाला सोडणार याविषयीही अस्पष्टता होती. पण रविवार पासून पक्षनिहाय उमेदवार घोषित झाले असून चारही विधानसभेचे चित्र आता स्पष्ट होत आहे. गंगाखेडमध्ये मात्र युतीतील जागा शिवसेनेला सुटल्याने ‘भाजपा’चे पदाधिकारी कमालीचे नाराज झाले आहेत. याठिकाणी विशाल कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यूतीचा मित्रपक्ष असणाऱ्या ‘रासप’कडे ही जागा होती. राजकीय उलथापालथ होत मित्रपक्ष रासपला जिंतूर मधून जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी मेघना बोर्डीकर यांनी ‘भाजपा’कडून तयारी दर्शवली होती. मात्र त्यांना आता ‘रासप’कडून निवडणुक आता लढावी लागणार आहे.
तर पाथरीची शिवसेनीची जागा भाजपने खेचून नेली आहे. पाथरीतुन आता विद्यमान आमदार मोहन फड हे भाजपाच्या चिन्हावर विधानसभा निवडणुक लढवतील. दरम्यान जिल्ह्यांमधून दबक्या आवाजात का होईना शिवसेना आणि भाजपाचे इच्छुक आणि पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. पण गंगाखेडमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे , भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश रोकडे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाला ‘आत्मक्लेश आंदोलना’च्या निमित्ताने उघड नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे आता होऊ घातलेल्या ‘विधानसभा निवडणूका’ जिल्ह्यामध्ये रंजक होणार असल्याचे दिसून येत आहे.