हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील क्रीडा कार्यक्रम बंद झालेले आहेत. तसेच अनेक दिवसांपासून क्रिकेटही बंदच आहे. मात्र आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येते आहे. वेस्ट इंडिजचा संघही इंग्लंडचा करणार आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट हे नव्या स्वरूपात खेळवले जाणार आहे. २७ जून ला दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कच्या मैदानावर तीन संघांमध्ये एक सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी आणि अनेक मोठे खेळाडू सहभागी असणार आहेत. मात्र हा सामना इतर क्रिकेट सामन्यांसारखा नसून काहीस वेगळा असणार आहे. यामध्ये सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे हा सामना दोन नव्हे तर तीन संघांच्यादरम्यान खेळवला जाणार आहे. तसेच त्याचे नियमही काहीसे वेगळेच असणार आहेत.
हा सामना माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, सध्याचा कर्णधार क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा यांच्या नेतृत्वाखालील तीन संघ यांच्यात होणार आहेत. या सामन्या बाबतची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. हा सामना चॅरिटीसाठी खेळवण्यात येणार असून यास Solidarity Cup असे नाव देण्यात आलेले आहे. या सामन्यातून जमा झालेला निधी हा कोरोना व्हायरसमुळे अडचणीत आलेल्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे.
कसे असतील या सामन्यातील नियम, जाणून घेऊयात,
या सामन्याच्या नियमांनुसार, प्रत्येक संघात आठ खेळाडू असतील.
तसेच हा सामना ३६ षटकांचा असेल. त्यात १८ षटकांनंतर ‘ब्रेक टाइम’ घेतला जाईल.
प्रत्येक संघ ६-६ षटकांच्या ब्रेकसह प्रत्येकी १२ षटके फलंदाजी करेल. त्यातील पहिली सहा षटके एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध, तर उर्वरित सहा षटके ही दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याविरूद्ध खेळवण्यात येतील.
संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाजही फलंदाजी करू शकेल, पण त्याला केवळ दुहेरी धाव घेता येईल. त्याने घेतलेली एकेरी धाव मोजली जाणार नाही.
या सामन्याच्या पूर्वार्धात सातपेक्षा कमी गडी बाद झाल्यासच इतर फलंदाज उत्तरार्धात फलंदाजी करू शकतात.
गोलंदाजी करताना संघ नवीन चेंडूचा वापर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध १२ षटकांसाठी करू शकतो.
प्रत्येक गोलंदाज हा जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकेल.
यामध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ हा विजेता म्हणून घोषित केला जाईल.
या सामन्यातील विजेत्या संघाला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक देण्यात येईल.
तसेच दोन संघांमध्ये टाय झाल्यास सुपर-ओव्हरने या सामन्याचा निर्णय होईल. मात्र जर तीनही संघांमध्ये टाय झाल्यास तिघांनाही सुवर्णपदक देण्यात येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.