हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारचे काम चांगल्या पद्धतीने चालले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक सूचक असे विधान केले आहे. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जो डब्बा जोडतील तोच डब्बा भविष्यात लागेल. महाराष्ट्रात सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील डबल इंजिन सरकार चालू आहे. शिंदे-फडणवीस ज्या इंजिनाबाबत निर्णय घेतील तेच इंजिन या डबल इंजिनला लागेल”, असे सत्तार यांनी म्हंटले आहे.
अब्दूल सत्तार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भविष्यात कदाचित ट्रिपल इंजिनचे सरकार होऊ शकते. पण या सरकारसोबत मनसे की राष्ट्रवादी काँग्रेस जाईल? ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी यांच्या युतीची सध्या चर्चा सुरु आहे.
“महाराष्ट्रात कोणतीही युती झाली तरी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र राहणार आहे. महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर जुडले तरी भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र राहणार आहे. आम्ही अडीच वर्षाच्या कामांचा बॅकलॉग भरतोय आणि निधीच्या स्वरुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या सरकारला भरपूर पाठिंबा देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही युती केली तरी आम्ही एकत्र आहोत” अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी ठाकरे – आंबेडकरांच्या युतीबाबत दिली.