हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले आहे ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. या सरकारकडून लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत,” अशी टीका पवारांनी केली.
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापाण्यावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचे सांगितले. तसेच उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात कोणकोणत्या मागण्या करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पवार म्हणाले की, एकंदरीतच अतिवृष्टी झाली आहे. वैणगंगा नदीला पूर आला असून भंडारा, गोंदीयामधील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ज्याप्रकारे मदत व्हायला हवी होती, ती शेतकऱ्यांना मदत झाली नाही. हे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. अतिवृष्टी ग्रस्तांच्या मागण्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ आण बागायतीसाठी दीड लाख रुपये मदत सरकारने आता त्यांना जाहीर करावी. तसेच अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ करण्यात यावे.
तुम्हाला मस्ती आली आहे का? – अजित पवार
यावेळी अजित पवारांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदार संतोष बांगर, प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत निशाणा साधला. हात तोडू, पाय तोडू, कोथळा काढू, अशी भाषा वापरली जात आहे. या आमदारांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. ही भाषा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी कशी काय चालते? या आमदारांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. बांगर यांनी तर सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. वेळ पडली तर आपण पुन्हा असे करू, असे म्हणण्यापर्यंत या आमदारांची हिंमत वाढली आहे. त्यांना एवढंच सांगतो फार मस्ती आली आहे का? अशा शब्दांत पवारांनी आमदारांना सुनावले.