हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सीमावाद, निधी, महापुरुष व महिलांबद्दल अपशब्द वापरणे आदी मुद्यांवरून यावरून शिंदे- फडणवीस यांच्यासह राज्यपाल,अब्दुल सत्तार, प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला. “कर्नाटकातून रोज शिव्या घातल्या जातायत, अनेक वाहने फोडली जातायत. मुख्यमंत्री बोम्मई दररोज बोलत असून आपल्याकडचे मंत्री आम्ही करतो असे म्हणतायत. काय करतो म्हणता.. आरे ला कारे कराना, इकडे अब्दुल सत्तार महिलांबाबत काहीही बोलतायात तुम्हाला सत्तेची मस्ती चढली आहे का? असा इशारा पवार यांनी दिला.
अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमात शिंदे- फडणवीसा यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सीमावाद सुरु आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राबाबत बोलले जात आहे. आणि आपल्याकडचे मुख्यमंत्री व नेते आम्ही हे करतो आणि ते करतो असे म्हणतायत. मध्यंतरी आम्ही कर्नाटकला जातो असे म्हणाले नंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला. नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती त्यांची झाली आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील विकासकामांना स्थगिती दिली. निधी काय कुणाच्या बापाच्या घरचा आहे काय? म्हणून कामांना स्थगिती दिली आहे. असा थेट सवाल पवारांनी केला. तसेच महापुरुषांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांवरही निशाणा साधला. चांगले बोलता येत नसेल आणि जमत नसेल तर घरी जावा, त्यांनी म्हंटले. आता काहीजण गरळ ओकत आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल गरळ ओकली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी राज्यपाल चुकीचे बोलले. अफजलखानाने शिवाजी महाराजांचा कोथळा काढला, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात. अरे गोपीचंदा काय बोलतो. आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे, सत्तेतील मंत्री काहीही बोलत आहेत, यांना सत्तेची मस्ती चढली आहे काय? अशी टीका पवारांनी केली आहे.