विशेष प्रतिनिधी | साधारण महिनाभरापूर्वीची ही गोष्ट आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाफ होणार असं वाटत असतानाच अजित पवार यांनीसुद्धा आमदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला अडचणीत आणलं अशा चर्चा सुरू झाल्या. काही काळासाठी ते गायबसुद्धा झाले. पवार घराण्यात काही बिनसलं का? अजित पवार आता राजकारण सोडून शेती करणार अशा चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या या वागण्याची खिल्ली उडवणारे एक नेते होते गिरीश महाजन.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील चर्चेत जितेंद्र आव्हाड म्हणत होते, आमचे अजितदादा एक दिवशी नक्की मुख्यमंत्री होतील. त्यावर गिरीश महाजन मिश्कीलपणे हसले आणि म्हणाले – आमच्या अजित पवारांना शुभेच्छाच आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या पक्षातील लोक संभाळावेत. महाजनादेश यात्रेचा झंझावात सुरू असल्यामुळे गिरीश महाजनांना तसं वाटण्यात गैर काहीच नव्हतं. आता महिनाभरानंतर हेच चित्र खरं होताना दिसत आहे. महाजनादेश यात्रेचा झंझावात शरद पवारांनी मोडून काढला आणि महाराष्ट्राचं सत्तासमीकरणच बदलून टाकलं. काँग्रेसच्या संयमी साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. अजित पवारांनीही आपल्या गायब नाट्याने राज्यातील माध्यमविश्व आपल्या बाजूने वळवलं आणि तिथूनच खेळ सुरू झाला – मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस मागील ३ दिवसांपासून कुठेच दिसत नाहीत. संजय राऊत यांनी २ आठवडे माध्यमविश्वात फुटेज खाल्लं खरं पण निर्णायक क्षणी दवाखान्यात जायची वेळ हा ‘पवारफूल’ राजकारणाचाच एक भाग होता का हे संजय राऊतच जाणोत. आघाडी सरकारच्या काळात १० वर्षं उपमुख्यमंत्रीपदावर बोळवण झालेल्या राष्ट्रवादीला आता खऱ्या अर्थानं काही करून दाखवण्यासाठी अच्छे दिन आले आहेत. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी सध्याचे त्यांचे शिलेदार आहेत अजित पवार. बिनधास्त, बेरकी आणि बेधडक वागण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांसाठी येता काळ हा निश्चितच आव्हानात्मक असणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात केवळ काँग्रेस पक्ष मोठा आहे म्हणून उपमुख्यमंत्री पदावर अजित पवारांची बोळवण झाली. जलसंपदामंत्री हे खातं सांभाळत असताना अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या मर्जीशिवाय त्यांचं राजकारणातील पान हलणार नाही हे माहीत असल्यामुळेच त्यांच्या मुख्यमंत्र्यांपदालाही मर्यादाच आल्या. पण यंदाच्या निवडणुकीने राष्ट्रवादीला पुनरुज्जीवित केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जाऊ म्हणत आता स्वच्छ प्रशासनाचा विचार अजितदादा करू शकतात. शिवसेनेसोबत सत्तेत भागीदारी असताना किमान काही काळाच्या मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो. भाजपने माघार घेतल्याने आता ज्येष्ठ, अनुभवी आणि अभ्यासू नेता म्हणून पहिलं नाव अजित पवारांचंच पुढं येत आहे. आता अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची दादागिरी सुरू होईल का याकडं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
मी काय म्हातारा झालोय का? अजून लई जणांना घरी पाठवायचंय असं म्हणत मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची घरवापसी तर शरद पवारांनी केली. शिवसेनेच्या कागदी वाघांनाही शांत करण्यात आज काँग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी झाली. उत्तम संवादकौशल्य असणाऱ्या व्यक्तीलाच हे जमू शकतं.. मग आता तुम्हीच सांगा – हे सगळं गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळेच झालं नसेल असं कशावरुन बरं..!!
अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच! काँग्रेसच्या पाठिंब्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार@ShivSena @OfficeofUT @INCIndiahttps://t.co/TMLdbiJt5f
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2019
महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट@ShivSena @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @NCPspeaks @AUThackeray @OfficeofUT https://t.co/MlWgwx6RIZ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2019
येऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन@AjitPawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule @PawarSpeaks#hellomaharashtra
https://t.co/2zbsxcKHeq— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2019