हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना खडसावले आहे. महाविकास आघाडीत कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं अजित पवार म्हणाले.
हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाला मंत्री करायचं हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी सांगितले.
नक्की काय म्हणाले होते संजय राऊत –
देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात नमूद केले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group