हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पवार यांनी अचानक राजीनामा देण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार हे राजीनामा देणार हे आधीच ठरलं होतं, असे पवार यांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडून गेला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते व नेते ऐकत नसल्याचे दिसता. अजित पवार यांनी पवारांच्या राजीनाम्याबाबत, निवृत्तीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही सर्व बसू, निवृत्तीबाबत चर्चा करू. तुमच्या भावना समजून घेऊ. तुम्ही जी भावनिक साद घातली. ती आमच्या लक्षात आली आहे. ती समिती तुमच्या मनातील योग्य तो निर्णय घेईल.
शरद पवार अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असं नाही. एका नेतृत्वाकडे जबाबदारी द्यायची आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनखाली काम करेल. साहेब म्हणजे पार्टी आहे. पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. ते लोकशाहीत लोकांचं ऐकत असतात. पवार साहेब, सोबत नाही. आता काही खरं नाही. आता काय करायचं? असं भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच 1 मे रोजी ते निर्णय जाहीर करणार होते. पण वज्रमूठची सभा होती. मीडियात तेच चाललं असतं. त्यामुळे 2 तारीख ठरली. त्यामुळे त्यांनी निर्णय जाहीर केला, असे अजित पवार यांनी म्हंटले.