हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आहेत. म्हणून गोंदवल्याच्या पायी दिंडीला विशेष महत्व आहे. ही परंपरा याआधी कधीच खंडित झालेली नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे यात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. गोंदवल्यातील श्रींचे समाधी मंदिर अद्याप बंदच असले तरी आषाढी पायी वारीची परंपरा न मोडता शासनाच्या नियमांचे पालन करीत मोजक्या भक्तांसोबत गोंदवल्याच्या दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. मंदिर प्रशासन आणि वारकरी मंडळ यांच्या सहमतीने हे नियोजन करण्यात आले.
दरवर्षी ज्या पद्धतीने प्रस्थान केले जाते त्याच उत्साहात हा सोहळा पार पडला. टाळ मृदूंगाच्या तालात मोजक्या पताकाधारी वारकऱ्यांच्या मागे पायी दिंडीने ग्राम प्रदक्षिणेसाठी प्रस्थान केले. अप्पा महाराज समाधी, दत्त, शनी, खंडोबा, सिध्दनाथ, मारुती, श्रीराम मंदिरात विसावा घेत आरती व भजन करून गावाच्या वेशीपर्यंत ही दिंडी आणली गेली. पुन्हा समाधी मंदिरात दिंडी नेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. अशा पद्धतीने वारीची परंपरा अबाधित ठेवण्यात आली.
कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे सध्या राज्यात संचारबंदी आहे. याच कारणास्तव नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन सरकारने वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पायी जाणाऱ्या संतांच्या पालख्या यावर्षी वाहनातून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.