बाबा आढाव हे एक चिवट आणि निडर चळवळ्या नेते – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपड्पट्टीधारक, हमाल, कष्टकरी यासारख्या असंघटीत कामगारांसाठी आयुष्य वेचणारे बाबा अशी ओळख असणारे नेते बाबा आढाव यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट ‘हमालांच्या कल्याणासाठी हिमालायाइतके कष्ट उपसणाऱ्या हिम्मतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे म्हणून वाढदिवसानिमित्त माझ्या मनपूर्वक शुभेच्छा!’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. पवार यांनी काही ट्विट करून आढाव यांच्या कामाचे तसेच आतापर्यंतच्या संघर्षाचे वर्णन केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात ते अग्रभागी असल्याची आठवण ही त्यांनी शेअर केली आहे.

 

‘बाबा आढाव १ जून रोजी वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत याचा मला मनापासून आनंद वाटतो. चांगली माणसे दीर्घायू असली पाहिजेत आणि बाबांना ते वरदान मिळाले आहे. बाबांनी कष्टकऱ्यांच्या कल्याणाचा वसा घेतला आणि ती एक प्रदीर्घ साधना असल्याने बाबांचे ध्यासपर्व शंभरीपार पोहचेल यात शंका नाही.’ अशी आशा पवारांनी व्यक्त केली आहे. बाबांच्या लढवय्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करत असताना पवार म्हणतात, ‘मला वाटते हवाबदल करण्यासाठी त्यांचे आवडते ठिकाण तुरूंग असावे. बाबांनी वयाच्या २२ व्या वर्षी अन्नधान्याची दरवाढ करून गरीबांची परवड करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करून तुरुंगवास भोगला.  बावन्न सालापासून त्यांनी तब्बल त्रेपन्न वेळा सामान्यांना न्याय देण्यासाठी कारावास पत्करला. यातून बाबा आढावांमध्ये एक चिवट आणि निडर चळवळ्या असल्याचे दर्शन घडते.’ १९२७ मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तरी जयपूर येथील न्यायालयासमोर मनुचा पुतळा कित्येक वर्षे तसाच राहिला होता. तो हटवण्यासाठी देखील बाबांनी लाँगमार्च काढला होता. अशा या पुरोगामी महाराष्ट्राच्या सुपुत्राची इतिहासात अक्षय्य नोंद राहील असे पवार यांनी ट्विट मधून म्हंटले आहे.

 

 

बाबांनी २०१२ मध्ये नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर असंघटित कामगारांसाठी पेन्शन परिषद घेतली. त्यांच्या प्रयत्नाने ४५ कोटी असंघटित कामगारांच्या भल्यासाठी सामाजिक सुरक्षा कायदा विधेयक संसदेत मंजूर झाले असले तरी अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत आहे.‘कष्टाची भाकर’ मिळवून देण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या बाबांच्या कष्टाचे हा कायदा अंमलात आल्याने चीज होईल. मध्यवर्ती शासनाने त्याकडे लक्ष पुरवावे याकडे देखील या निमित्ताने लक्ष वेधतो. असेही पवार यांनी सांगितले आहे. बाबांनी स्थापन केलेल्या संघटनांचीही पवारांनी त्यांच्या ट्विट मधून नोंद केली आहे. आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.