हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान आता बीडच्या एका शेतकऱ्याने थेट राज्यपालांनाच पत्र लिहले असून राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून मलाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवले आहे.
बीड येथील श्रीकांत विष्णू गदळे या शेतकऱ्याने २२ जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारे पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र ती मिळाली नाही.
आज मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी. राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी’ अशी मागणी केली आहे.