Wednesday, June 7, 2023

हत्या करुन मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठ्या ठेवणाऱ्या बीडच्या सिरीअल किलरला अखेर अटक

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडच्या शिरुर तालुक्यातील आनंदगांव शिवारात 6 मे रोजी एका 65 वर्षीय व्यक्तीचा झोपेतच खून करण्यात आला होता. तर दुसऱ्या घटनेत खांबा लिंबा शिवारात घरासमोर झोपलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी आरोपीने चिठ्ठी ठेवली होती त्यामध्ये त्याने दुसऱ्याच इसमाची नावे टाकली होती. तसेच या आरोपीने जर मला अटक न केल्यास खुनाचे सत्र पुढे असंच सुरू राहील म्हणत पोलिसांना आव्हानच दिले होते. हा आरोपी गेल्या वीस दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर 20 दिवसांनंतर वर्धा जिल्ह्यातील पुजाई गावात दिड किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांनी या आरोपीला अटक केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीडच्या शिरुर तालुक्यातील आनंदगाव शिवारात 65 वर्षीय शेतकरी कुंडलीक सुखदेव विघ्ने हे 6 मे रोजी रात्री शेताची राखण करण्यासाठी गेले होते. या दरम्यान शेतात झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करत असताना त्यांना त्यावेळी मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत आरोपीने पोलिसांना आव्हान दिलं होतं. पण आरोपीने दुसऱ्याच्या नावाने ती चिठ्ठी लिहिली होती.विशेष म्हणजे 6 मे रोजी जी हत्येची घटना घडली त्याच घटनेच्या अवघ्या चार दिवसांआधी खांबा लिंबा गावच्या नारायण सोनवणे यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला होता.

नारायण हे आपल्या घरासमोर झोपले असताना एका अज्ञात आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी तिथे चिठ्ठी सोडून पळून गेला. या हल्ल्यात नारायण गंभीर जखमी झाले. पण सुदैवाने ते बचावले. या दोन घटनेच्या ठिकाणी पोलिसांना दोन वेगेवेगळ्या नावांची चिठ्ठी सापडली होती. पण पोलिसांनी निरखून पाहिलं असता त्या दोन्ही घटनांच्या ठिकाणी सापडलेल्या चिठ्ठ्यांमधील हस्ताक्षर हे सारखं असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या मागे एकाच आरोपीचा हात आहे असे पोलिसांना समजले आणि त्यांनी त्या पद्दतीने तपास सुरु केला.

यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता या खुनाच्या घटनेमागे शिरुर तालुक्यातील ताकडगाव येथील भगवान चव्हाण याचा हात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच त्यादिशेने आपला तपास वळवला. पोलीस त्याचा शोध घेत पैठण येथील बिडकीन गावी गेले. पण पोलिसांना आपली भनक लागल्याची माहिती आरोपीपर्यंत पोहोचली आणि तो त्या ठिकाणाहून फरार झाला. तो वर्धा येथील पुजाई गावात पळून गेला. पण पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. अखेर पोलिसांनी दीड किलोमीटर पाठलाग करुन आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. आपल्या सासरच्या मंडळींना अद्दल घडवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल