हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी-बारावीची परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाकडून यंदा परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून बोर्डाने प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विध्यार्थ्यांना आता पेपर सुरु होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी केंद्रावर हजर राहावे लागणार आहे.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेत नियोजन करण्यात आले. राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे प्रकार चालत होते. तर दुसरीकडे पेपर सुरु झाल्यानंतर काही शिक्षक विद्यार्थ्यांना पासिंगपुरते वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे अनुचित प्रकार घडत असल्याने याला आळा घालण्यासाठी बोर्डाने परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पेपर पोहचविण्याचीया ‘या’ संस्थेकडे जबाबदारी
दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर दिली जाणार आहे. पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या ‘रनर’वरील जबाबदारी वाढविली आहे. कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर पोचल्यावर वेळोवेळी ‘रनर’ला त्यांच्याकडील मोबाइल किंवा कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.
बोर्डाने केली नवीन नियमावली तयार
दहावी-बारावीची परीक्षा यंदा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकांची देखील भरारी पथके नेमली जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत.
दहावी-बारावी परीक्षेची स्थिती
एकूण विद्यार्थी : 32 लाख
एकूण परीक्षा केंद्रे : 8000
बारावीचा पहिला पेपर : 21 फेब्रुवारी
दहावीचा पहिला पेपर : 2 मार्च