भाजपकडून पवारांना 2 मोठ्या ऑफर; ‘त्या’ भेटीबाबत पृथ्वीबाबांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता भाजपकडून शरद पवारांना दोन मोठ्या पदांची ऑफर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवारांना ही ऑफर दिली गेली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या ऑफरची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना दिली आहे. जर भाजपची ही ऑफर शरद पवार यांनी मान्य केली तर राजकीय वर्तुळातील समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.

फ्री प्रेसशी बोलताना, “भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. परंतु शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

त्याचबरोबर, “शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना देखील भाजपने ऑफर दिल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली आहे. अजित पवार नुकतेच कामानिमित्त दिलेल्या गेले होते त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली यावेळेस या नेत्यांनी त्यांना शरद पवार यांना प्रस्ताव मांडण्यास सांगितले. पुढे, पुण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यापुढे मांडला” असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, सर्वात प्रथम भाजपने राष्ट्रवादीचे मुख्य नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांना आपल्या गटात सहभागी करून घेतले आहे. यानंतर आता भाजप शरद पवार यांना देखील आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ही खेळी खेळली असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे शिवसेना देखील नाराज झाल्याचे दिसत आहे. कारण, माध्यमांशी बोलताना, “या बैठकींची किती गरज आहे, याचा निर्णय शरद पवार यांनीच घ्यायचा आहे” असे चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.