व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपासह जाण्यात स्वारस्य नाही, पण…; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवारांनी भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स शरद पवारांना दिल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, शरद पवार भाजपच्या या ऑफर्स स्वीकारतील का? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावर शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना, शरद पवार यांनी भाजपासह जाण्यात स्वारस्य नसल्याचे म्हणले आहे.

शरद पवार काय म्हणाले?

सांगोला येथे पत्रकारांकडून शरद पवार यांना भाजपसोबत जाण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, भाजपासह जाण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही. मात्र काही हितचिंतक आहेत ज्यांना वाटतं आहे की मी भाजपासह जायला तयार व्हावं. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे की, भाजपासह जाणं ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते राजकीय धोरणही नाही. काही हितचिंतक माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासह जाणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट सांगितले आहे.

त्याचबरोबर, आमच्या पैकी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यानंतर काही हितचिंतकांना हे वाटतं आहे की, आम्हीही तिकडे जावं. त्यामुळे (अजित पवार) हे हितचिंतक आमच्याशी चर्चा करत आहेत. आमची भूमिका बदलेल का यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून मला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. शरद पवारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

मुख्य म्हणजे यावेळी पत्रकारांकडून शरद पवार यांना त्या दोघांमध्ये झालेल्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “अजित माझा पुतण्या आहे. त्याला भेटलो तर त्यात चुकीचं काय? काका-पुतण्या एकमेकांना भेटू शकत नाही का? पवार कुटुंबातला मी वडील माणूस आहे. मला माझ्या कुटुंबातल्या लोकांना भेटायचं असेल तर त्यात काय चुकलं?” असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, शरद पवारांनी माध्यमांसमोर केलेले हे वक्तव्य भाजप आणि अजित पवार यांना सूचित करण्यासाठी होते का? आता असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.