रोज रोज खोटे सांगून तोंडाची वाफ का घालवताय?; चंद्रकांत पाटील यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मलिक व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “सरकार आपले असल्याने त्यांच्याकडून बेछूटपणे आरोप केले जात आहेत. तोंडाची वाफ का घालवताय रोज? एक शिवसेना खासदार संजय राऊत पुरे नाहीत का? कि आता नवाब मलिक यांना रोज सकाळी उठून बोलायला लावताय? असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचे परिणाम मलिक यांना खूप भोगावे लागतील. त्यामागचे कारण पुराव्याशिवाय ज्यावेळेला आपण जेव्हा बोलतो. त्यावेळेला ते पुरावे नाही सापडले तर जी स्थिती होते ती फार वाईट असते. महाविकास आघाडी प्रत्येकवेळेला असा कोणी एक चेहरा उभा करते कि त्या चेहर्याने मूळ चाललेल्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करायचे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहे. त्यावर बोलत नाहीत. समीर वानखेडे यांच्याबाबत सांगायचे झाले तर भाजप वानखेडे यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आमच्यावर आरोप केले जात आहेत. जलयुक्त शिवार योजनेवर आरोप केले जात आहे. सरकार आपले असल्याने त्यांच्याकडून बेछूटपणे आरोप केले जात आहेत. तोंडाची वाफ का घालवताय रोज? एक शिवसेना खासदार संजय राऊत पुरे नाहीत का कि आता नवाब मलिक यांना रोज सकाळी उठून बोलायला लावताय?, असा सवाल पाटील यांनी यावेळी केला आहे.