महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची बाईक अडवल्याने पोलिसाच्या कानशिलात लगावली अन्…

Mla
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एका महिला आमदाराची दादागिरी पाहायला मिळाली. या महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावला होता. यामुळे संतप्त झालेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलला कानशिलात लगावली. या प्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड या ठिकाणी घडली. या ठिकाणच्या अपक्ष महिला आमदार रमिला खरिया यांना आपल्या भाच्याला अडवून दंड ठोठावल्याचा इतका राग आला की त्यांनी कॉन्स्टेबललाच कानाखाली मारली. या हेड कॉन्स्टेबलचे नाव महेंद्र नाथ सिंह असे असून त्यांनी महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाकाबंदी असल्याने दुचाकीवरुन जात असलेल्या सुनील बारिया याला पोलिसांनी अडवले. कोरोनामुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणा-जाणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी आपली दुचाकी थांबवताच सुनीलला याचा राग आला आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊ लागला. यामुळे हेड कॉन्स्टेबलने त्याला दंड ठोठावला. या हेड कॉन्स्टेबलची तक्रार सुनीलने आमदार रमिला यांच्याकडे केली. यानंतर महिला आमदाराने कॉन्स्टेबलला कानशिलात लगावली.

या प्रकरणी महेंद्र नाथ यांनी आमदारावर गुन्हा नोंदवण्याविषयी बोलले असता स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांनी त्यांना महिला आमदाराची माफी मागण्यास सांगितले. त्याला महेंद्र नाथ यांनी नकार दिला. यानंतर बाकी पोलीस महेंद्रच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि संपावर गेले. तसेच त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. यानंतर अखेर पोलिसांनी आमदाराविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. याबरोबर महेंद्र नाथ याच्याविरोधात केस दाखल करण्यात आली, कारण आमदाराविरोधात तक्रारीचा तपास सीबीसीआयडी करते. त्यामुळे हे प्रकरण सीबीसीआयडीकडे सोपवले गेले आहे.