व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

10 मार्च नंतर राज्यात भाजपच सरकार येणार असा माझा दावा नाही ; चंद्रकांतदादांची पलटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल होईल. तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असा दावा केला होता. मात्र, माझा हा दावा नसल्याचे पाटील यांनी म्हणत पलटी मारली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे येथे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी तसे बोलावे लागले. मात्र, मी असा दावा केलेला नाही, असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

यावेळी पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत जे बोलतात त्याला गंभीरपणे घेत नाही. सुपातले जात्यात जात आहेत. एक दिवस सगळे जण जात्यात जातील. अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत. मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा कट रचला गेलेला आहे. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या ईडीचा वापर करतात असं राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावे, असेही यावेळी पाटील यांनी म्हंटले.