Sunday, May 28, 2023

‘मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला, नौटंकी करणे तुमचा स्वभावच ; चंद्रकांतदादांचा पटोलेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या गंभीर घटनेवरून काँग्रेस नेत्यांनी टोला लगावला. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला नौटंकी असे म्हटल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पटोलेंना इशारा दिला. पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप पाटील यांनी दिला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच ट्विट करीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५-२० मिनिटे एखाद्या उड्डाणपुलावर थांबावे लागल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच काँग्रेसवर निशाणाही साधला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेला ढिसाळपणा म्हणजे देशद्रोही कॉंग्रेसने गाठलेला कळस आहे. मी पंजाब येथील काँग्रेस सरकारचा निषेध करतो.असे चंद्रकांतदादांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

यावेळी पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पंजाब दौरा रद्द करावा लागल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर भाजपच्या आरोपांना आता काँग्रेस नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ‘मोदींनी जे पेरलं तेच उगवलं’, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला होता.