मुंबई । आज अक्षयतृतीयाचा सण असूनही सर्व बाजारपेठ ओस आहेत. देशभरातील लॉकडाउनमुळे सर्व मंदिरं बंद आहेत. आज देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात आहे. तेव्हा कोणीही प्रार्थना करण्यासाठी घराबाहेर पडू नका असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच जे काही असेल ते करण्याचे आवाहन केले. अक्षयतृतीयेनियमित्त ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोल्ट होते.
राज्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा दिली आहे. त्याचा अहवाल रोज माझ्याकडं येत आहे. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचं काय करायचं याबाबतचा निर्णय ३ मे नंतरच घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन कधी संपणार याबाबत चर्चा होत आहे. त्याबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
लॉकडाऊन कधी संपणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे. लॉकडाऊनचे नक्कीच चांगले परिणाम आहेत. लॉकडाऊनमुळं करोना रुग्णांची गुणाकारानं होणारी वाढ संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ नियंत्रणात आणली आहे. या लॉकडाऊनचा आपल्याला नक्कीच फायदा झाला आहे. लॉकडाऊन लवकर संपवण्यासाठी आणि या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण तज्ज्ञांची मदत घेत आहोत, असं ठाकरे यांनी सांगितलं.