‘त्या’ ट्विटमधून फडणवीसांची मनातील भावना बाहेर आली बस..एवढंच- काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांच्या स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. ट्विटरवर वाद वाढत असल्याचे समजताच काही वेळानंतर फडणवीस यांनी ती पोस्ट काढून टाकली. या संपूर्ण प्रकारावर ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.

“संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!,” असं ट्विट करत सावंत यांनी फडणवीस यांच्यासकट संघभाजपवर शाब्दिक प्रहार केला.

दरम्यान, शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे समाज सुधारणेचे काम पाहता फडणवीसांनी त्यांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ करण्याला नेटकऱ्यानी तीव्र आक्षेप घेतला आहे. बऱ्याच जणांनी फडणवीस यांनी मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. या वादग्रस्त प्रकारानंतर सोशल मीडियावर फडणवीस यांनी शाहू महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकारावरून फडणवीस सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे.

काय केलं होत फडणवीसांनी ट्विट
छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून महाराजांना अभिवादन केलं. “थोर सामाजिक कार्यकर्ते वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन,” असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. मात्र, फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment