हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केल्या जात आहेत. अनेकांच्या संस्था, घरांवरही छापेमारी केली जात आहे. यावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे सध्या राज्यात हे सगळे सुरु आहे. एवढे झाले तरी कुणालातरी शिक्षा झाली आहे का? किमान एक दिवसाची जरी शिक्षा झाली असती तर आम्ही मानले असते. पण सगळे तोडपाणी करण्याकरता चालले असल्याची घणाघाती टीका चव्हाण यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत धाडी टाकण्याचे काम केले जात आहे. अगोदर महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तेवर धाडी टाकायच्या. धाडी टाकल्याणानंतर त्याचे फोटो काढायचे आणि ते सर्वत्र करून त्याची पेपरबाजी करायची. अशा प्रकारचे काम सध्या राज्यात सुरु आहे. पण धाडी टाकल्यानंतरहि कुणालातरी शिक्षा झाली असल्याचे बघण्यात आले नाही.
किमान एक दिवसाची जरी कुणाला शिक्षा झाली असती तर आम्ही मानले असते. परंतु हे सगळे एका कारणासाठी केले जात आहे. ते कारण म्हणजे तोडपाणी करण्याकरता होय. केवळ आपल्या पक्षात घेण्यासाठी मोदी सरकारकडून नेत्यांना भीती घालण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोपही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.