हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोनाने थैमान घातलं असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थिनीशी फोनवर चर्चा केली असून धीर दिला आहे. दरम्यान भारतीय दूतावासाला विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
करोनाचे संकट लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी मंगळवारी फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथून कॉलालाम्पूरमार्गे मुंबईत येण्याचा मार्ग निर्णय घेतला. मलेशियात पोहचलेल्या या विद्यार्थ्यांना मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाने बुधवारी सकाळी सिंगापूर येथे आणण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं तिकीटही देण्यात आलं. मात्र, बुधवारी दुपारी मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे बोर्डिंग पास घेण्यावेळी या विद्यार्थ्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. सध्या हे सर्व विद्यार्थी सिंगापूर येथे अडकले असून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.