हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमधील एर्नाकुलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या ६९ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. राज्यात या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूची ही पहिली घटना आहे. सरकारी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एर्नाकुलम येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला २२ मार्चला दुबईहून परत आल्यानंतर वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनियाच्या लक्षणांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले पण नंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.
निवेदनात असे सांगण्यात आले आहे की त्याला हृदयविकार आणि उच्च रक्तदाब देखील होता आणि बायपास शस्त्रक्रियादेखील झाली होती. सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निवेदनानुसार, मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आला आहे. केरळमध्ये आतापर्यंत १७६ लोकांना या आजाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.