मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यस्थेलामोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवदेन देत केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आजच्या राज्यपाल भेटीचा तपशील देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. पवार वारंवार केंद्रातील मोदी सरकारला पत्रं लिहून विविध मागण्या करत आहेत. बाराबलुतेदार आणि शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करण्यासाठी त्यांनी एखादं पत्रं राज्य सरकारलाही लिहावं, असा टोला फडणवीस यांनी त्यांना लगावला. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसंच दुकानदारांना, फुटपाथवर बसणाऱ्यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावं, असंही ते म्हणाले. राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात नाहीत, केवळ राजकारण सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार पंतप्रधान मोदींना राज्यातील परिस्थितीबाबत अवगत करून देत केंद्राकडे मदतीची मागणी करत आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करणार काल आणखी एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लॉकडाउनचा आर्थिक फटका शेती क्षेत्राला सुद्धा बसला आहे. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत म्हणाव्या तशा काही ठोस तरतुदी नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून च आज फडणवीस यांनी पवार यांना लक्ष केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”