माझा पुनर्जन्मावर विश्वास, मी 1857 च्या युद्धातही झाशीच्या राणीसोबत लढत असेन… : देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा तिथे हजर होतो असे नुकतेच एक विधान केले होते. त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही फडणवीसांना टोला लगावला होता. त्यांच्या टोल्याला आज फडणवीसांनी उत्तर दिले आहे. “मी हिंदू आहे. मागील जन्मावर आणि पुर्नजन्मावर माझा विश्वास आहे. 1857 च्या युद्धातही झाशीच्या राणीसोबत आणि तात्या टोपेंसोबत लढत असेन. पण आपण तेव्हाही इंग्रजांसोबत असाल”, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या टोमण्याला उत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी बाबरी मशीद पाडली. त्यावेळी जो संघर्ष झाला तो मर्सिडीज बेबीला काय कळणार? पण मला त्यांना सांगायचे आहे की, बाबरी ढाचा पाडला गेला त्यावेळी मी तिथे स्वत: होतो. त्यावेळी मी नगरसेवक होतो. मी एक हिंदू आहे. आणि माझा मागील जन्मावर विश्वास आहे तसेच पुर्नजन्मावर देखीलही विश्वास आहे. त्यामुळे कदाचित मागच्या जन्मात जर मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढत असेन आणि जर त्यावेळी तुम्ही असाल तर त्यावेळीही तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल.

मात्र, आताच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर आता तुम्ही अशा लोकांशी युती केली आहे की जे लोक १८५७ ला स्वातंत्र्ययुद्धच मानत नाही. ते १८५७ ला शिपायांचे बंड म्हणतात. त्यामुळे मला अशा लोकांविषयी अधिक काही बोलायचे नाही. त्यांना काय बोलायाचे दे बोलू देत, असेही यावेळी फडणवीस यांनी म्हंटले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले फडणवीसांबद्दल?

बाबरी मशिदीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा एक विधान केले तेव्हा यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या विधानाची खिल्ली उडवली होती. तेव्हा ठाकरे म्हणाले होते की, 1857 च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचे योगदान असेल. फडणवीस यांच्या दाव्यावर मी काही बोलणार नाही. 1857 च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं कदाचित योगदान असू शकेल. आता ते जाऊ द्या…, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती.