व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळालंय; देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर टीका केली जात आहे. यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. आमच्याशी बेईमानी करून सत्ता मिळवली. पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली ती नीट चालवून दाखवावे. खरं तर भाजपला विजय मिळाला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या तोंडच पाणी पळाले आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

मुंबईत भाजपच्यावतीने राज्यसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी, शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्हाला शिवसेनेसोबत सत्ता दिली होती, मात्र आमच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही दुसऱ्यासोबत संसार मांडला. त्यांनी किमान आता ती सत्ता किमान नीट चालवून दाखवावी. आज जे चालले आहे ते मोदींच्या प्रोजेक्टमुळे सगळे सुरु आहे. सर्व केंद्राच्या भरवशावर सुरु आहे. यांना सगळा जीएसटीचा पैसा दिल्यानंतरही हे म्हणतात पैसा मिळाला नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी करु कसे?

राज्यसभेच्या निवडणुकीची ही छोटी लढाई होती, मोठी लढाई बाकी आहे. येत्या काळात मनपा, पंचायत समिती, जि.प. सगळ्या स्तरावर यांना आपणपराभूत करणार आहोत. 2024 ला आपण सगळ्यांना पराभूत करु. त्यामुळे कार्यकर्त्यांनो उत्साह काम ठेवा, सुरुवात झाली आहे. मुंबई मनपावर आपल्याला भाजपचा भगवा लावायाचाय, त्यासाठी तयार राहा, असे आवाहन यावेळी फडणवीसांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी आंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास थांबलाय, केवळ आमच्याशी लढायचे म्हणून अनेक प्रकल्प थांबवलेत, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाही. आता मूल्ह्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन जरा विचार करण्याची गरज आहे. त्यांना जर खरंच माहिती असेल की हे कुणामुळे जिंकलेत तर ते काही करणार नाही. कारण यांना सरकार टिकवायचे आहे.