व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सभा घेत भाजपसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभा घेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. “मुख्यमंत्री ठाकरे यांची झालेली सभा ही मास्टर सभा नाही तर लाफ्टर सभा होती. शिवसेनेची सभा कौरवांची होती तर भाजपाची सभा ही पांडवांची आहे. उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार, असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.

देवेंद्र फडणवीस गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सभास्थळी 6:30 वाजता दाखल झाले. मुंबई येथील फडणवीसांच्या जाहीर सभेला भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, किरीट सोमय्या यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबरी पाहायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होत. गरज पडली तर पुन्हा कारसेवा करू त्या ठिकाणी जाईन.

उद्धवजी वजनदार लोगोंसे संभालके रहना. माझ्या वजनाने बाबरी पडली असती असे जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर केवढा हा विश्वास आहे. तसेच बाबरी आंदोलनात तुम्ही नव्हते असे मी म्हणालो तर तुम्हाला लगेच मिरची लागली. तुम्ही आमची संपत्ती घेवून दुसऱ्याशी लग्न केले. किमान घटस्फोट तरी घ्यायचा होता, असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.

पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर…

उद्धव ठाकरे यांनी पहाटेच्या शपथ निधीबाबत केलेल्या वक्तव्याचा फडणवीसांनी समाचार घेतला. यावेळी फडणवीस म्हणाले की, आमचा जर पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती. ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्‍यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो, हे लक्षात घ्यावे, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

सरकारचे वर्क फ्रॉम जेल सुरू

यावेळी फडणवीसांनी कोविड काळात महा विकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला तसेच दाऊदचे सहकारी असणारे नेते या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात असल्याची टीका फडणवीसांनी केली. सध्या या सरकारचे वर्क फ्रॉम जेल सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.

जाहीर सभेपूर्वी हनुमान चालीसेच केलं पठन

आज देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेची जोरदार तयारी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होते. सभा स्थळी फडणवीस दाखल होताच त्याचे कार्यकर्त्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सभा सुरु करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.